महिंद धरणाच्या सांडव्याजवळील संरक्षक भिंत कोसळली,धरण सुरक्षित
धरण ओव्हरफ्लो, पावसाचा जोर कायम
Published:Aug 17, 2020 01:47 AM | Updated:Aug 17, 2020 01:47 AM
News By : Muktagiri Web Team
महिंद धरणाच्या सांडव्याच्या बाजुला बोर्गेवाडी रस्त्याजवळ बांधलेली संरक्षक भिंत जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे कोसळली.
तळमावले प्रतिनिधी l संदीप डाकवे
महिंद धरणाच्या सांडव्याच्या बाजुला बोर्गेवाडी रस्त्याजवळ बांधलेली संरक्षक भिंत जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे कोसळली. सुमारे ८५ दशलक्ष पाणीसाठवण क्षमता असलेले महिंद धरण महिन्यापुर्वीच भरून वाहू लागले होते. गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार असल्याने धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहू लागले होते. गेल्या वर्षी धरणाची गळती होत असल्याने गळती काढण्यासाठी जॅकेटींगला ना. शंभूराज देसाई यांनी कोट्यावधी रूपयांचा निधी दिला होता. त्यामुळे धरणाची गळती थांबली होती. परंतु चार दिवसापासून विभागात जोरदार पडत असलेल्या पावसामुळे महिंद स्टाॅप ते बोर्गेवाडी रस्त्यावर सांडव्याच्या बाजुला रस्त्यासाठी बांधलेली संरक्षक भिंत कोसळली.त्यामुळे रस्ता खचण्याची शक्यता आहे. परंतू धरणाला कोणताही धोका नसल्याने नदीकाठच्या गावातील लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असे धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.