सासवडला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतले माऊलींच्या पादुकांचे दर्शन
वारकऱ्यांसोबत भोजन करत अनुभवला भक्तीचा अविस्मरणीय सोहळा
Published:Jul 12, 2026 09:11 PM | Updated:Jul 12, 2026 09:11 PM
News By : Muktagiri Web Team
मुक्तागिरी वृत्तसेवा
नीरा दि.१२ ( वार्ताहर)
अखंड हरिनामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रविवारी ( दि.१२) सासवड येथील पालखीतळावर जाऊन संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. 'माऊली'च्या चरणी नतमस्तक होत त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली.
वारीच्या समतेच्या आणि सेवाभावाच्या परंपरेला अभिवादन करत सुनेत्रा पवार यांनी वारकरी आणि पालखी प्रमुखांसमवेत जमिनीवर बसून भोजन केले. यावेळी त्यांनी वारकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या वारीतील अनुभव जाणून घेतले. भक्ती, समता आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या या पवित्र परंपरेचा त्यांनी आत्मीयतेने अनुभव घेतला.
यावेळी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पालखी सोहळा प्रमुख अँड.राजेंद्र उमाप,आळंदी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ.भावार्थ देखणे तसेच अन्य पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते. संपूर्ण परिसर "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषाने आणि भक्तिरसाने भारावून गेला.सुप्रिया सुळे यांनी हि घेतले माऊलींचे दर्शन घेतले
, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.