वाई:
वाई शहरात जुन्या भांडणाचा राग धरून एका सलूनचालकाला आणि त्याच्या वडिलांना लोखंडी हत्याराने मारहाण केल्याची घटना ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ओंकार सुनील तावरे (वय २६, रा. रविवार पेठ, वाई, जि. सातारा) यांचे मुख्य बाजारपेठेत, हरिहरेश्वर बँकेच्या खाली तळमजल्यावर 'राजकलम' नावाचे सलूनचे दुकान आहे. सहा महिन्यांपूर्वी एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून आरोपींसोबत त्यांचे भांडण झाले होते. याच कारणाचा राग मनात धरून आरोपी विजय अंकुशी (रा. बावनधन नाका, वाई) आणि जुनेद शेख (रा. फुलेनगर, वाई) यांनी फिर्यादीला फोन करून बोलावून घेतले.
तेथे पोहोचल्यानंतर विजय अंकुशी याने फिर्यादीला "तुला लय मस्ती आली आहे का?" असे म्हणत कानाखाली मारली, तर जुनेद शेख याने हाताने मारहाण केली. हाणामारीचा आवाज ऐकून आलेले फिर्यादीचे वडील सुनील वसंत तावरे भांडण सोडवण्यास आले असता, विजय अंकुशी याने त्याच्या हातातील लोखंडी हत्याराने सुनील तावरे यांच्या कपाळावर आणि भुवईच्या वरच्या दोन्ही बाजूस मारून गंभीर जखमी केले.
या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात भा. न्या. सं. कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार राहुल भोईर करीत आहेत.